Wednesday, 11 March 2020

विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन साजरा २०२०

*जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या महिलांचा स्वाभिमान*-  सौ.किर्तीताई पांगारकर
बीड दि-८ मार्च (बीड प्रतिनिधी) जागतिक महिला दिन शहरातील विनायक प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उध्दघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर,भारती क्षीरसागर मॅडम,मुंडे महानंदा मॅडम यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्री,राष्ट्रमाता जिजाऊ,लोकनेत्या स्व. केशरकाकूं क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. महिला दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश भागडे सरांनी करून जागतिक महिला दिनाचे महत्त्व विषद केले. एक महिला घराला घरपण देते,आधार देते,कष्टणाऱ्या वेदना ती सहन करत कुटुंबाचा कणा ती असते.महिला आज आपले अस्तित्व टिकवून समाजाला पुढे नेते आहे,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये तिचे योगदान अतुलनीय आहे.आई,बहीण, पत्नी,मुलगी या नात्यांमध्ये ती तिची भूमिका बजावत असते असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आई म्हटलं की मनामध्ये चांगल्या विचारांची प्रतिमा दिसून येते.आई आपल्याला जन्म देऊन संस्कारमय बनवण्यात तिचा मोलाचा वाटा असतो.'स्वामी तिन्ही जगाचा,आई विना भिकारी' आई शिवाय या जगात मोठे कुणी नाही.माझ्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी मी अनेकांना त्यांच्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहील यामुळेच माझ्या आईला खूप आनंद होईल त्यासाठी मी सदैव अग्रेसर राहील हीच माझ्या आईला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सदिच्छा ठरेल अशा मौलीक विचारभावना अशोक काशीद सरांनी आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या.मुलगी म्हणजे पित्याच व आईच काळीज असतं.हृदयात घर करत असत.लाडक्या मुलीच्या आगमनाने घरामध्ये लक्ष्मी नांदत असते.अंगणामध्ये बाग फुलवणारी,रांगोळी साकारणारी ती एक कलेचा सागर असते.मुलीच आई बापावरील प्रेम खूप असतं.सासरला जातांना मनातल्या मनात सर्व काही दाटल्यासारखं  होतं.. चैतन्य, वात्सल्य, माया ,ममता ही प्रत्येक मुलींच्या स्वभावात असतं ते आईबापांच्या काळजाचा तुकडा असतं. बदलत्या सामाजिक परिस्थिती नुसार तिच्यावर लादलेली बंधन आज कुठं कमी झाली आहेत.. आई बापाचा विश्वास ती असते.सासरला गेल्यानंतर आई,वडील,भाऊ, बहीण हे काळजीच आपुलकीच नात कायम टिकवून राहतं.लेक वाचवा,देश वाचवा यासाठी मुलींच्या जन्माचे स्वागत करून तिचे स्वप्न साकार करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा असे प्रतिपादन विवेक गव्हाणे सरांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून  मनोगत व्यक्त केले. महिलांच्या महतीचे विविध स्फूर्ती गीते, काव्यगायन गाऊन शाळेतील विविध शिक्षक,शिक्षिकांनी सादर करून नारी शक्तीच्या विचारांची गुंफण केली.तुच जिजाई, तुच रमाई,तुच अहिल्या तुच सावित्री या महिलांच्या कार्याचा वसा आणि वारसा हा महिलेचा आदर व स्वाभिमान आहे. या थोर माता महिलांचे अस्तित्व आहे.त्यांचे विचार,संस्कार,आदर्श आजही महिलांना सामर्थ्य व शक्ती देत आहेत.एक उत्तम स्त्री एक आई बनते, बहीण बनते,मुलगी बनते,एक पत्नी बनते.घरादाराच सारं सारं ती बघत असते.तिलाही भावना असतात,प्रेम असते,माया असते ती सर्वांसाठी धडपडते, कुटुंबातील सर्वांची काळजी घेते.ती वेगवेगळ्या भूमिका बजावत,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेते.जिजाऊ,सावित्री, अहिल्या, रमाई हा तिचा स्वाभिमान आहे हा कर्तृवाचा वारसा आणखी फुलवणारी व जोपासणारी महिलाच असते असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भावना जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकरांनी व्यक्त करून जागतिक महिला दिनाच्या उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या वर्षभरातील उल्लेखनीय कार्य केल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताईंना 'विनायक कोहिनूर' व शाळेतील शिक्षिका सौ.वर्षा म्हेत्रे मॅडम यांना 'विनायक स्टार' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये जागतिक महिला दिनाचे यशस्वी निवेदन तन्वीर पठाण सरांनी केले तर उपस्थितांचे आभार शैला बावस्कर मॅडम यांनी मानले..